Ad will apear here
Next
लोकनाट्याचा ‘राजा’
‘लोकनाट्याचा राजा’ अशी ओळख ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने मिळवली, ते ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर (९०) यांचे १५ फेब्रुवारी २०२० रोजी निधन झाले. त्यांच्या कारकिर्दीचा हा अल्प परिचय...
............
राजा मयेकर हा अभिनेता सर्वार्थाने लोकनाट्याचा राजा होता. किरकोळ शरीरयष्टी असलेल्या या अभिनेत्याने आपल्या सहज, समर्थ अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर तब्बल साठ वर्षे अधिराज्य गाजवले. जनतेनेच त्यांना ‘लोकनाट्याचा राजा’ असा बहुमानाचा किताब दिला होता आणि तोच त्यांनी लोकनाट्य कलेला दिलेल्या अपूर्व योगदानाचा गौरवही होता. 

प्रेक्षकांना आपल्या हजरजबाबी संवादाने खळखळून हसवणारा, रंगमंदिरात हशा, टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पाडायला लावणाऱ्या, या अभिनेत्याच्या निधनाने मराठी लोकनाट्याचा राजा तर हरपला आहेच, पण मराठी रंगभूमीचीही हानी झाली आहे. वयाच्या दहाव्या वर्षी सुरू झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास अलीकडे वृद्धापकाळामुळे थांबला होता. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वाभस घेतला आणि मराठी लोकनाट्य, रंगभूमी, चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन क्षेत्राच्या जुन्यासह बदलत्या काळाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
 
राजा मयेकर यांची जन्मभूमी कोकण. बालपणीच कोकणातल्या दशावतारी नाटकांचे संस्कार त्यांच्यावर झाले. नाटकाच्या वेडाने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांनी मुंबई गाठली. तिथल्या प्राथमिक शाळेत शिकत असतानाच वेशभूषा स्पर्धेत भाग घेणाऱ्या मयेकरांना आपल्यातला हास्य अभिनेता गवसला. आपल्याला लोकांना हसवता येते, हे त्यांना कळले. मुंबईतल्या गिरणगावच्या चाळीत राहणाऱ्या मयेकरांनी शालेय शिक्षण थांबवून रंगभूमी हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवले. उदरनिर्वाहासाठी लालबागला कलाकार फोटो स्टुडिओ सुरू केला. शाहीर कृष्णकांत साबळे यांनी त्यांच्यातले स्पष्ट उच्चाराचे-संवादफेकीचे कौशल्य हेरले आणि पुढे शाहीर साबळे आणि पार्टी या संस्थेच्या विविध लोकनाट्यांत त्यांना अभिनयाची संधी दिली. तिचे मयेकर यांनी अक्षरश: सोने केले. 

कोयना स्वयंवर, नशीब फुटके सांधून घ्या, बापाचा बाप, आंधळं दळतंय, असुनि खास मालक घरचा ही लोकनाट्ये आणि प्रहसनाद्वारे मयेकर यांनी सारा महाराष्ट्र आपल्या अभिनयाने गाजवला. आंधळं दळतंय, यमराज्यात एक रात्र, असुनि खास मालक घरचा ही त्यांनी भूमिका केलेली तीन लोकनाट्ये लोकप्रियतेच्या शिखरावर गेली होती. या लोकनाट्यांच्या प्रयोगात मयेकर यांनी प्रवेश करताच प्रेक्षकांत हास्याची कारंजी उडत. लोकांना कसे हसवायचे आणि परिस्थितीनुसार संवाद कसे फेकायचे, या तंत्रात ते कुशल होते; पण त्यांनी आपल्या विनोदाची पातळी कधीही खालावू दिली नाही. त्यांचे विनोद अत्यंत संयमी असत. विनोदाद्वारे लोकरंजनाचे नवेच युग त्यांनी निर्माण केले होते.

रूपनगरची मोहना, ग्यानबाची मेख ही त्यांनी अभिनय केलेली लोकनाट्येही महाराष्ट्रात गाजली. ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांत शाहीर साबळे यांच्या लोकनाट्य संस्थेमुळेच उत्तम दर्जाची लोकनाट्ये पहायला मिळाली. त्यात मयेकर यांचा सहभाग मोलाचा होता.

दशावतारी नाटके, लोकनाट्यांबरोबरच सूर राहू दे, गहिरे रंग, धांदलीत धांदल या व्यावसायिक, तसेच बालगंधर्वांनी केलेल्या संगीत भावबंधन, एकच प्याला, बेबंदशाही, संशयकल्लोळ या नाटकांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या. धाकटी बहीण, स्वयंवर झाले सीतेचे, कळत नकळत, झंझावात, लढाई, या सुखांनो या, या चित्रपटांसह मयेकरांनी दूरदर्शनच्या गप्पागोष्टी या मालिकेतही भूमिका केली होती. 

चित्रपट, नाटक, दूरदर्शन, संगीत नाटक या विविध क्षेत्रांत मयेकरांनी ५००हून अधिक व्यक्तिरेखा आपल्या समर्थ अभिनयाने साकारल्या होत्या. शाहीर साबळे, शाहीर दादा कोंडके आणि निळू फुले यांच्याबरोबरच लोकनाट्याच्या परंपरेला वैभव मिळवून द्यायचे श्रेय राजा मयेकर यांनाही जाते.

- वासुदेव कुलकर्णी
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZQXCJ
Similar Posts
‘व्यंगनगरी’चा राजा! नेमके भाष्य करणाऱ्या प्रभावी व्यंगचित्रांच्या माध्यमातून एक काळ गाजविणारे नामवंत राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे २७ डिसेंबर २०१९ रोजी मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
कलापूरच्या चित्र परंपरेचा वारसदार : श्यामकांत जाधव कोल्हापूरच्या चित्र परंपरेचे वारसदार असलेले चित्रकार श्यामकांत जाधव यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय...
स्वर-भावगंधर्व २६ ऑक्टोबर हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेला हा लेख...
शंभरावे अखिल भारतीय नाट्यसंमेलन होणार डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध सिनेनिर्माते, दिग्दर्शक जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language